नवी दिल्ली,दि.24: नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी विमान कोसळले. काठमांडूहून पोखरा येथे 19 प्रवाशांना घेऊन जाणारे सूर्या एअरलाइन्सचे विमान टेक ऑफ केल्यानंतर जमिनीवर घसरले आणि आग लागली. या अपघातात 18 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून एक पायलट बचावला आहे.
या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये विमान धावपट्टीवरून टेक ऑफ केल्यानंतर लगेचच जमिनीवर घसरते आणि आग लागते.
प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक मीडियाला सांगितले की, विमान धावपट्टीच्या दक्षिणेकडील टोकावरून उड्डाण करत होते. अचानक विमान पलटले आणि धक्के बसल्यानंतर ते जमिनीवर आदळले. जमिनीवर आदळताच विमानाला आग लागली आणि नंतर धावपट्टीच्या पूर्वेकडील खड्ड्यात पडले.
अपघातानंतर विमानतळावर सर्वत्र धुराचे लोट दिसू लागले. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत.
नेपाळच्या ‘द काठमांडू पोस्ट’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, विमान पलटी होताच त्याला आग लागली आणि काळा धूर निघू लागला. काही वेळातच संपूर्ण विमानतळावर काळा धूर पसरला.
काठमांडू त्रिभुवन एअरपोर्टवर झालेल्या दुर्घटनास्थळी बचाव पथक टीम हजर आहे. रेस्क्यू टीमनं आग नियंत्रणात आणली आहे. 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. विमान दुर्घटनेत पायलट सुरक्षित असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. उपचारानंतर त्याची चौकशी केली जाऊ शकते.