मुंबई,दि.24: अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मुलाच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या बरोबर गेले. मी आणि माझ्या वडिलांची छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील, असे विधान अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श ठेवूनच आमच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. यापुढेही महाविकास आघाडीचेच काम करणार, अशी ग्वाही गोकुळ झिरवाळ यांनी दिली. यामुळे अजित पवार गटाचे धाबे दणाणले आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नाशिक येथे मंगळवारी निष्ठावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे या मेळाव्याला हजर होते. यावेळी ते म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांचेच काम केले. यापुढेही महाविकास आघाडीचेच काम करणार. कुटुंब आणि राजकीय व्यवस्था वेगळी असल्याचेही त्यांनी नमूद केले.