नवी दिल्ली,दि.२१: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाकडे जगाचे लक्ष असतानाच भारताने एक मोठी मुत्सद्दी खेळी खेळली आहे. भारत आणि रशिया यांच्यात ऐतिहासिक संरक्षण करार (Defense Deal) झाला असून, आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या करारामुळे भारताच्या शेजारील देशांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
लष्करी तळांच्या वापरासाठी ऐतिहासिक करार
भारत आणि रशियामध्ये ‘रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट’ (Reciprocal Exchange of Logistics Support – RELOS) करार पार पडला आहे. या करारामुळे दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांचा (Military Bases) वापर करू शकणार आहेत. यामध्ये युद्धनौका (Warships) आणि विमाने तैनात करण्याची परवानगी समाविष्ट आहे. रशियाच्या युद्धनौका भारताच्या संरक्षणासाठी मदतीला येतील, तसेच ३००० हून अधिक सैनिक एकमेकांना सहकार्य करतील.
पाकिस्तानचा जळफळाट आणि रशियाला इशारा
या करारामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञ डॉ. अतिया अली काझमी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना रशियाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, “मॉस्कोने ही मोठी चूक केली आहे. भारताने ज्याप्रमाणे अमेरिकेचा विश्वास संपादन करून आता भूमिका बदलली, तशीच फसवणूक ते रशियाचीही करतील.”
चीनसाठीही मोठा धक्का
पाकिस्तानी तज्ज्ञांच्या मते, या आशियाई प्रदेशात भारत नव्हे तर चीन हीच मोठी शक्ती (Emerging Power) आहे. मात्र, रशियाने भारतासोबत हातमिळवणी केल्याने चीनच्या वर्चस्वालाही धक्का बसला आहे. भारताला एकाच वेळी अमेरिकेची गुंतवणूक (Investment), चिनी बाजारपेठ आणि रशियन लष्करी तंत्रज्ञान (Russian Components) हवे आहे, जे साध्य करण्यात भारत यशस्वी होताना दिसत आहे.








