दारूवरून भाजपाच्या मंत्र्याने महिलांना दिला अजब सल्ला

0

मुंबई,दि.29: दारूवरून भाजपाच्या मंत्र्याने महिलांना अजब सल्ला दिला आहे. अनेकांचे पती दारू पितात. यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागते. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री नारायण सिंह कुशवाह सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. भोपाळमध्ये आयोजित एका नशामुक्ती कार्यक्रमात कुशवाह यांनी भाषणात दारूचे व्यसन सोडवण्यासाठी महिलांना एक अजब सल्ला दिला आहे.

‘पतीची दारू सोडवायची असल्यास त्याला घरीच दारू प्यायला सांगा, दारू पिऊन आल्यास पतीला लाटणं दाखवा’, असा सल्ला मध्य प्रदेशचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी दिला. कुशवाह यांच्या या सल्ल्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘पतीने दारु सोडावी, असे माझ्या माता-भगिनींना वाटत असेल तर सर्वप्रथम त्यांना दारू घरी आणून तुमच्यासमोर प्यायला सांगा. त्यांना हे ही सांगा की तुम्हाला पाहून मुलंही दारू पितील. यामुळे त्यांना स्वतःला लाजिरवाणे वाटेल आणि ते तुमच्यासमोर कमी दारू पितील. मग हळूहळू दारू सोडतील’, असे कुशवाह यांनी म्हटले आहे.

तसेच ‘जे पती बाहेरून दारू पिऊन येतात त्यांना लाटणं दाखवा, जेवण देऊ नका. तुमची लाटणं गँग बनवा. सामाजिक संस्कारांमुळे अनेक महिला असं करत नाहीत, मात्र चुकीच्या गोष्टी रोखायच्या असतील तर संस्कार बाजूला ठेवा. ज्या राज्यात दारूबंदी आहे, तिथेही चोरून दारू विक्री केली जाते. त्यामुळे दारूबंदी जनजागृती हा एकमेव उपाय आहे’, असेही कुशवाह यांनी सांगितले.

कुशवाह यांच्या सल्ल्यावर काँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुशवाह यांचा उद्देश चांगला आहे पण सल्ला चुकीचा आहे. पती घरी दारू प्यायला तर ते घर क्लेषाचं केंद्र बनेल आणि घरगुती हिंसाचार वाढेल. त्यामुळे त्यांनी दारू पिऊ नका, असा सल्ला द्यायला पाहिजे होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here