कोल्हापूर,दि.29: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘लोकांची मानसिकता आता स्पष्ट झालेली आहे. लोकं मोदींच्या कारभारावर खुश नाहीत. लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्यात हरकत नाही.’ ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. असेही पवार म्हणाले.
भाजपाचे गेल्या वेळी किती खासदार होते आणि आता किती कमी झाले याची नोंद मोदींनी घ्यावी. आमचे सरकार स्वबळावर आले असे ते म्हणतात. पण हे 100 टक्के खोटे असून त्यांच्याकडे बहुमत नाही. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घेतली नसती तर आज केंद्रात मोदींचे सरकार नसते. त्यामुळे लोकांनी आपल्याला स्पष्ट बहुमत दिलेले नाही ही वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकले जाणार नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.
मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी.. माझी गॅरंटी. पण ती गॅरंटी चाललेली दिसत नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रचाराचा संपूर्ण भार मोदींवर होता. मोदींनी महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या आणि त्यातल्या 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीवेळी मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असा मिश्किल टोलाही शरद पवार यांनी लगावला.
पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला. 155 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने आमचे बहुमत ठरवले आहे. हीच स्थिती विधानसभेत असेल आणि सत्ताबदल होईल, असा ठाम विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.