सिडनी,दि.6: Danushka Gunathilaka Arrested: श्रीलंकन क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलाका (Sri Lankan Cricketer Danushka Gunathilaka Arrested) याला बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमधून श्रीलंकेचं आव्हान सुपर 12 फेरीतच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियातून मायदेशी रवाना झाला. पण या टीमचा एक सदस्य क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलाका (Danushka Gunathilaka Arrested) मात्र सध्या सिडनी पोलिसांच्या ताब्यात आहे. यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकन टीमचा भाग असलेल्या आणि काही सामन्यात खेळळेल्या दनुष्का गुणतिलकाला सिडनी पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. 2 नोव्हेंबरला एका महिलेनं दिलेल्या तक्रारीवरुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात सिडनीतल्या एका महिलेनं केलेल्या तक्रारीवरुन गुणतिलकाला अटक करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबरला या महिलेनं त्याच्यावर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार ऑनलाईन डेटिंह ॲपवर ते दोघं बराच काळ संपर्कात होते. दरम्यान 31 वर्षीय गुणतिलकाला एका हॉटेलमधून रात्री 1 वाजता अटक करण्यात आली.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं स्पष्टीकरण
दरम्यान श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं गुणतिलकाच्या अटकेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. धनुष्का गुणतिलकाला एका महिलेच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं श्रीलंका क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे.
दुखापत झाल्याने संघातून बाहेर
टी-20 विश्वचषक स्पर्धेत दनुष्का गुणतिलाका हा श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. मात्र, तो फक्त एकच सामना खेळू शकला. नामिबियाविरोधात त्याने एकमेवक सामना खेळला. त्यानंतर जखमी झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याऐवजी अशीन बंदारा याचा समावेश श्रीलंकेच्या संघात करण्यात आला होता. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याला संघासोबत ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता.
दनुष्का गुणतिलाका हा डावखुरा फलंदाज असून त्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 2500 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. गुणतिलाकाने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दनुष्का गुणतिलाकाने 47 वनडे, 46 टी-20 सामने आणि आठ कसोटी सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने वनडे मध्ये दोन शतकं झळकावली आहेत.