नागपूर,दि.22: भाजपा आमदाराने शरद पवार आणि मनोज जरांगे यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी आग्रही आहेत. तर लक्ष्मण हाके व नागनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये यासाठी उपोषण करत आहेत. राज्यातील वातावरण मराठा-ओबीसी आरक्षणावरून तापलं आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत, असा आरोप भाजपा आमदाराने केला आहे.
शरद पवार यांचं पाठबळ
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचं पाठबळ आहे. शरद पवार यांनी नेहमी मराठा राजकारण केलं, ते ओबीसीविरोधी आहेत. त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार आणि राजेश टोपे त्यांना भेटायला गेले होते. याउलट ओबीसी आंदोलन सुरु झाल्यानंतर तिकडे कोणीही फिरकले नाही, असे वक्तव्य भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते परिणय फुके यांनी केले. ते शनिवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
यावेळी परिणय फुके यांनी शरद पवार हेच मनोज जरांगे यांना पाठबळ पुरवत असल्याचा गंभीर आरोप केला. शरद पवार हे ओबीसीविरोधी आहेत. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहिली आहे, हे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी ओबीसींसाठी काहीच केलं नाही. उलट त्यांच्याविरोधात भूमिका घेतली, असा आरोप परिणय फुके यांनी केला.
हेच जरांगे यांना पाहिजे
आमची भूमिका नेहमी एकच आहे की, मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, त्यांना ओबीसीतून आरक्षण नको. मनोज जरांगे यांचा काही दुसरा हेतू आहे. राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले. यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले आणि ओबीसीतून मिळाले तर राज्यात तेढ निर्माण होईल, हेच जरांगे यांना पाहिजे.