मुंबई,दि.22: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्त्युतर दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करू असे म्हटले होते. यावर भुजबळ यांनी प्रत्त्युतर दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा इशारा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी उडवून लावला आहे. मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आमदारकीचं काय घेऊन बसलाय?, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा इशारा उडवून लावला आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी भुजबळांना सोडणार नसल्याचं म्हटलं आहे.
दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे. आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही. ओबीसी आंदोलनामागे येवलेवाले आहेत. त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे. तुम्ही आमची शाळा करणार का, राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो, मग तुम्ही किती पळता ते पाहतो, या शब्दांत मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले छगन भुजबळ?
तुमचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी मंत्रीपदाचाही राजीनामा दिला होता. तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलाय? माझं करीअर चालवणं किंवा संपवणं हे पक्षाच्या हातात आहे. आणि जनतेच्या हातात आहे. जनतेचं कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे. त्यांना जर 9 मंत्र्यांना घरी बसवायचं तर बसवा. भुजबळांना घरी बसवलं तर भुजबळ ओबीसांचा मुद्दा रस्त्यावर येऊन मांडेल, असा इशाराही त्यांनी दिला.