सोलापूर,दि.22: सोलापूर येथील सिध्देश्वर मार्केट यार्डातील अडत व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या कांदा व लसणाची रक्कम न देता 27 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विकी ऊर्फ विघ्नेश सेल्वराजी रा. चेन्नई याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. खुने यांनी मंजूर केला.
यात हकिकत अशी कि, फिर्यादी सिध्दाराम चन्नप्पा बावकर सिध्देश्वर मार्केट यार्ड, सोलापूर यांनी प्रथमतः सन 2021 व 2022 मध्ये शेतकऱ्यांकडून घेतलेला कांदा आरोपी विघ्नेश अँण्ड कंपनी, बेंगलोर व इरोड/सेलम यांना पाठवले होते. त्या बदल्यात आरोपी हा फिर्यादीचे बँक खात्यात पैसे पाठवत होता. त्यांचा नियमित व्यापार सुरु असल्याने फिर्यादी हा शेतकऱ्यांकडून घेतलेला कांदा व लसूण हे विश्वासापोटी सतत पाठवित होता.
फिर्यादी ने फेब्रुवारी ते एप्रिल 2021 व एप्रिल 2022 मध्ये आरोपी विकी सेल्वराज व एस.नागमणी यांना विश्वासापोटी शेतकऱ्यांकडून घेवुन दिलेला एकूण 3564 किलो कांदा व लसूण पाठवला होता परंतु त्याची एकूण रक्कम रू.38,72,743/- मिळाली नसल्याने शेतकरी फिर्यादीचे दुकानात येऊन वारंवार गोंधळ घालत असल्याने फिर्यादीने आरोपीला त्याच्या मोबाईल वरून फोन करून व समक्ष जाउन पैसे देण्यासाठी विनंती केली असता, पैसे देण्यासाठी टाळत असल्याने व शेतकरी ऐकून घेण्याची मनस्थितीत नसल्याने फिर्यादीने आरोपी विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.
यात आरोपीने अटक होईल ह्या भितीपोटी सत्र न्यायालयात ॲड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. यात आरोपीतर्फे न्हावकर यांनी युक्तिवाद करताना सदर व्यवहार हा दिवाणी स्वरूपाचा असून आरोपीने पूर्वी घेतलेल्या मालाची रक्कम फिर्यादीस दिलेली असल्याने आरोपीचा सुरुवातीपासून फसवणुकीचा उद्देश होता, असे म्हणता येणार नाही व त्यामुळे फसवणुकीचे कलम लागू होत नाही, असे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले व त्यापृष्ठर्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीनावर मुक्त करणेचा आदेश पोलिसांना पारित केला.
यात आरोपीतर्फे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. वैष्णवी न्हावकर, ॲड. राहुल रुपनर, ॲड. श्रेयांक मंकणी यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. माधूरी देशपांडे यांनी काम पाहिले.