नवी दिल्ली,दि.२५: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी २८ मिनिटं चर्चा केली. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची सत्यपाल मलिक यांनी रोखठोक उत्तरं दिली. पुलवामा, शेतकरी आंदोलन, जातनिहाय जनगणना, मणिपूर हिंसाचार यांवरचे प्रश्न राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांना विचारले. तसंच सत्यपाल मलिक या मुलाखतीत म्हणाले लोकसभा निवडणुकीला सहा महिने उरले आहेत. अशात मी लेखी द्यायला तयार आहे की आता मोदी सरकार येणार नाही.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक काय म्हणाले?
जम्मू काश्मीरचे लोक हे प्रेमळ आहेत. तुम्ही तिथल्या लोकांवर सक्तीने कुठलाही निर्णय लादू शकत नाही. लष्कराच्या हाती त्यांचे प्रश्न देऊन तिथले प्रश्न सुटणार नाहीत. त्याउलट तुम्ही (सरकारने) त्यांची मनं जिंकली तर जम्मू काश्मीरचे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. जेव्हा मी राज्यपाल होतो मी त्यांचा विश्वास संपादन केला होता. असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द करुन हे राज्य केंद्रशासित केलं. त्यांना वाटलं होतं की पोलीस बंड करतील. मात्र जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी केंद्र सरकारची साथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आश्वासन दिलं आहे की ते लवकरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देतील. तसं करायचं असेल तर सरकारने तिकडे निवडणूक घेतली पाहिजे असंही मलिक म्हणाले.
RSS च्या विचारधारेबाबत काय वाटतं? मला वाटतं की भारताच्या राजकारणात दोन विचारधारा आहेत. एक गांधी विचारधारा आणि दुसरी RSS ची विचारधारा. एक अहिंसा आणि बंधुभाव सांगणारी विचारधारा आहे. तर दुसरी विचारधारा हिंसेवर आणि तिरस्कारावर बेतलेली आहे. तुमचं मत काय? असं राहुल गांधींनी विचारलं. त्यानंतर मलिक म्हणाले, “माझा विचार असा आहे की देशाला आता लिबरल हिंदुत्वाची गरज आहे आणि तो दृष्टीकोन महात्मा गांधींचा होता. त्यासाठी त्यांनी खेड्याकडे चला हा मंत्रही दिला होता. जर आपला देश या विचारधारेवर चालला तरच व्यवस्थित गोष्टी पुढेही घडतील. अन्यथा देशाचे आणखी तुकडे होण्याची भीती नाकारता येत नाही. महात्मा गांधींचा विचार हा देश जोडणारा आणि बंधुभाव जपणारा विचार होता. आज त्याच विचाराची गरज देशाला आहे.” असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.