मुंबई,दि.26: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच आता वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सदावर्तेंनी टीका केली होती. त्यावरुन मराठा तरुणांनी तोडफोड केल्याची चर्चा आहे. गुरुवारी आज पहाटेच्या सुमारास ही तोडफोड करण्यात आली आहेत.
गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवर येथे राहतात. त्याच्या बिल्डिंगच्या खाली असलेल्या गाड्यांची तरुणांकडून तोडफोड करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या दोन गाड्या मराठा क्रांती मोर्च्याच्या तरुणांकडून फोडण्यात आल्याचे कळतंय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना अटक केली आहे.
दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. हे दोघेही मुख्य याचिकाकर्ते होते. याच याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. यामुळे तेव्हापासूनच गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष असल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यापासून गुणरत्न सदावर्ते सातत्याने समाजावर टीका करत होते. त्यामुळं मराठा समाज नाराज होता. गुणरत्न सदावर्ते यांना बोलू नका, असाही इशारा देण्यात आला होजा. जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला होता. गुणरत्न सदावर्ते यांना कोणीतरी बोलायला लावतेय किंवा प्रवृत्त करतेय, असं बोललं जात होतं. त्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्याची तोडफोड केली आहे.