काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.१७: काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे, अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणे हे सगळं महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी ठरवून केलं होतं. त्यामागे देवेंद्र फडणवीस होते मी ते विधानसभेतही म्हटलं होतं. आता ते स्पष्ट झालं आहे असं म्हणत नाना पटोलेंनी गंभीर आरोप केला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

परमबीर सिंह हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले होते हे देखील स्पष्ट झालं आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता निलंबन रद्द करुन पुन्हा सेवेत घेण्यासाठी मदत केली आहे. असाही आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

कॅटच्या ऑर्डरमध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला स्पष्ट आदेश दिले होते की आपण चौकशी करून आरोपपत्र दाखल करा तसेच परमबीर सिंह यांची विभागीय चौकशी करा. पण शिंदे फडणवीस सरकारने ते केले नाही. परमबीर सिंह यांना निलंबित केले होते पण त्यांच्या निलंबनाचा दर तीन महिन्याला आढावा घेऊन निलंबनाला मुदतवाढ देणे आवश्यक होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारने ना परमबीर सिंह यांची विभागीय चौकशी केली ना त्यांच्या निलंबनाला मुदतवाढ दिली. त्यामुळे कॅट न्यायाधिकरणासमोर झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या भूमिकेमुळे परमबीर सिंह यांना दिलासा मिळाला.

२५ फेब्रुवारी २०२१ ला काय घडलं?

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ (अँटेलिया) २५ फेब्रुवारी २०२१ च्या संध्याकाळी साडे सहा-सात वाजेच्या सुमारास एक संशयित कार आढळून आली होती. या कारबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारची तपासणी केली होती. त्यावेळी कारमध्ये काही जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या.

जेव्हा याबाबतची माहिती माध्यमांसमोर आली तेव्हा संपूर्ण देशात अक्षरश: खळबळ उडाली. एवढंच नव्हे तर त्याच दिवशी पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज देखील लागलं. ज्यामध्ये दिसून आलं की, एका व्यक्तीने स्कॉर्पिओ कार अँटेलिया बाहेर पार्क केली होती आणि नंतर तो मागे उभ्या असलेल्या इनोव्हा कारमधून निघून गेला होता.

या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रांचकडे चौकशीसाठी सोपवलं होतं. तेव्हा या प्रकरणाचे तपास अधिकारी हे सचिन वाझे हे होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here