सोलापूर,दि. 23: सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे प्रस्ताव पडताळणीसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजने अंतर्गत सुरत-चेन्नई या राष्ट्रीय हरित महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयाअंतर्गत बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यामधून हा महामार्ग जात आहे. तसेच सोलापूर जिल्हयाअंतर्गत माळशिरस तालुक्यामधून राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी म्हसवड- टेंभूर्णी रोड व राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 ई म्हसवड-पिलीव-पंढरपूर हा महामार्ग जात आहे.
सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे प्रस्ताव पडताळणीसाठी शिबीराचे आयोजन
सुरत-चेन्नई या राष्ट्रीय हरित महामार्गासाठी अक्कलकोट तालुक्यातील 17 गावांपैकी 1) उमरगे 2) चपळगांव 3) कोन्हाळी 4) बोरेगांव 5) नागोरे 6) नागणहळळी 7) डोंबरजवळगे 8) मिरजगी 9) मैंदर्गी 10) चपळगांबवाडी 11) दहिटणेवाडी 12) हसापूर 13) मुगळी 14) दुधनी 15) इटगे असे एकूण 15 गांवातील बाधित गट धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. परंतु अक्कलकोट तालुक्यातील फक्त 37 गट धारकांनी प्रस्ताव सादर केलेला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.548 सी म्हसवड-टेंभूर्णी रस्त्यासाठी माळशिरस तालुक्यातील एकूण 10 गावांपैकी भांबुर्डी, बागेवाडी, संगम या तीन गावांना मंजूरी आलेली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.548 ई म्हसवड-पिलीव-पंढरपूर रस्त्यासाठी माळशिरस तालुक्यातील कुसमोड, मळोली, पिलीव, तांदुळवाडी या चार गावांना मंजूरी आली आहे. त्यानुसार बाधित खातेदारांना नुकसान भरपाई घेऊन जाणेकामी नोटीसाही पारित करण्यात आलेल्या आहेत. नमूद गावचे काही बाधित खातेदारांनी अद्याप नुकसान भरपाई मिळणेकामी मागणी प्रस्ताव सादर केलेले नाही.
संपादनाचे नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन त्यांची त्वरीत तपासणी करुन नुकसान भरपाईची रक्कम अदा करणेकामी पुढील प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी गांव पातळीवर नुकसान भरपाई रकमेचे प्रस्ताव दाखल करुन घेणे, दाखल प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता करुन देणे, संबंधित आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेणेकामी दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी तहसिल कार्यालय अक्कलकोट येथील मिटींग हॉल येथे तसेच दि.29 सप्टेंबर 2023 रोजी तहसिल कार्यालय माळशिरस मिटींग हॉल येथे सकाळी 11.00 वाजले पासून शिबीर आयोजित करणेत आले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील व माळशिरस तालुक्यातल संपादित गावचे बाधित धारकांनी संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळणेकामीचे प्रस्ताव शिबीरामध्ये दाखल करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 11 अभिजीत पाटील यांनी केले आहे.
शिबीरामध्ये नुकसान भरपाई मागणी प्रस्तावाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणेत येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.