नवी दिल्ली,दि.२३: बसपाचे खासदार दानिश अली यांच्यावर भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. लोकसभेनंतर राज्यसभेतील महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपाकडून सोशल मीडिया प्रचार आणि विजयोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली. विधेयक संमत झाले तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बराच काळ लागणार आहे, अशी टीका विरोधकांनी केली असली तरी भाजपाने या आरोपांना फारसे उत्तर दिले नाही. मात्र, तरीही भाजपाच्याच एका खासदाराने केलेले अश्लाघ्य वक्तव्य भाजपाच्या विजयोत्सवाच्या आड आले आहे. शुक्रवारी लोकसभेत भाषण करत असताना भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांना उद्देशून अश्लाघ्य विधान केले, ज्याचे पडसाद देशभर उमटले आहेत.
बसपाचे खासदार दानिश अली यांच्यावर भाजपा खासदार रमेश बिधुरी यांची अश्लाघ्य भाषेत टीका
महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर तोंडसुख घेणाऱ्या भाजपाला रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यामुळे मात्र मागे सरकावे लागले. दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बसपाचे खासदार दानिश अली यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला. दानिश अली यांनी बिधुरी यांच्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यासोबतच त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेले पत्रही पोस्ट केले आहे.
संसदेच्या नव्या इमारतीमध्ये पहिल्याच अधिवेशनात बिधुरी यांच्या वक्तव्यामुळे एकप्रकारे लोकशाहीवरच आघात झाला आहे. त्यामुळे बिधुरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दानिश अली यांनी या पत्राच्या माध्यमातून केली.
बिधुरी यांच्या विधानावर सर्व विरोधकांनी एकजुटीने भाजपावर हल्लाबोल केला. काँग्रेसने टीका केली की, पंतप्रधान मोदींकडूनच अशाप्रकारच्या भाषेला प्रोत्साहन दिले जात आहे; तर खासदार जयराम रमेश यांनी बिधुरी यांच्या भाषणाच्या व्हिडीओमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यामध्ये बिधुरी अश्लाघ्य वक्तव्य करत असताना डॉ. हर्षवर्धन आणि रवीशंकर प्रसाद हे दोन माजी केंद्रीय मंत्री हसून बिधुरी यांना दाद देताना दिसत आहेत.