सोलापूर,दि.19: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या खासदाराच्या मुलीच्या कारने चिरडल्याने एकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर खासदाराची मुलगी घटनास्थळावरून पळून गेली होती, तिला पोलिसांनी शोधून अटक केली. मात्र, काही वेळातच तिला पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळाला. ही घटना सोमवारी रात्री (17 जून) घडली आहे.
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांच्या मुलीने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीला तिच्या बीएमडब्ल्यू कारने चिरडले. या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेनंतर राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी माधुरीला पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळाला. बीडा मस्तान राव हे वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत.
या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव सूर्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी सूर्या मद्यधुंद अवस्थेत चेन्नईच्या बेसंत नगर भागात फूटपाथजवळ रस्त्याच्या कडेला पडून होता. अचानक एक कार आली, ज्यामध्ये माधुरी आणि तिची मैत्रीण प्रवास करत होत्या. कारने सूर्याला चिरडले. टायगर वरदचारी फर्स्ट क्रॉस स्ट्रीटकडे वळल्यानंतर सूर्या रस्त्यावर पडलेला त्यांना दिसला नाही, असा आरोपींचा दावा आहे.