“नागपूरमध्ये लबाड लांगडं ढोंग करतंय… बाकी सगळे सोंग करतायत” संजय राऊत

0

मुंबई,दि.८: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले असून विधानसभा सभागृहात ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर आज शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून भाजपावर जोरदार टीका केली.

“नागपूरमध्ये लबाड लांगडं ढोंग करतंय… बाकी सगळे सोंग करतायत”, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच नवाब मलिक यांच्याप्रमाणेच प्रफुल पटेल यांच्यावरही आरोप आहेत. दाऊदशी संबंधित लोकांशी त्यांनी व्यवहार केला, असा आरोप भाजपानेच केला होता. मग प्रफुल पटेल यांच्याबाबतीत एक न्याय आणि नवाब मलिकांवर हल्ला कशासाठी? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

संजय राऊत म्हणाले, “नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते मंत्रीही होते. त्यांच्यावरचे आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. नवाब मलिक यांच्यासंदर्भात याआधी अजित पवार आणि जयंत पाटील व इतर नेत्यांनी भूमिका घेतली होती की, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना गुन्हेगार ठरवू नका. विधानसभेच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे इतर सहकारी नवाब मलिक यांच्याविषयी जे वक्तव्ये करत होते, ते पाहण्यासारखे आहे.

नवाब मलिक आता वैद्यकिय जामिनावर बाहेर आले असून काल ते विधानसभेत अजित पवार गटाच्या शेजारी जाऊन बसले. त्यामुळे भाजपाला आता नैतिकतेचे बुडबुडे येऊ लागले आहेत. हे पूर्णपणे ढोंग आहे. एखाद्या कपटी कोल्ह्यानं वाघाचं कातडं ओढून नैतिकतेच्या डरकाळ्या फोडाव्या, तसा हा प्रकार आहे.”

तुम्हाला प्रफुल पटेल कसे चालतात?

संजय राऊत पुढे म्हणाले, “नवाब मलिक यांच्यासारखेच आरोप आणि खटला प्रफुल पटेल यांच्यावरही दाखल केलेला आहे. त्यांचे दाऊदशी संबंधित व्यक्तीशी व्यवहार झाले आहेत, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याबद्दल ईडीने कारवाईदेखील केली असून पटेल यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यूपीएच्या काळात प्रफुल पटेल मंत्री असताना याच मुद्द्यावर भाजपाने सोनिया गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मग प्रफुल पटेल यांच्याबद्दल फडणवीस यांचे मत काय आहे? हा प्रश्न विचारावा लागेल.”

“तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रफुल पटेल हे अमित शाह यांना जाऊन भेटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गोंदियात आले, तेव्हा प्रफुल पटेल यांनीच त्यांचे स्वागत केले. त्यामुळेच भाजपाचे लोक ढोंग करत आहेत, असे मी म्हणालो. भाजपाची वॉशिंग मशीन आता बिघडली आहे”, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here