मुंबई,दि.८: अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्राबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीने. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले नवाब मलिक सध्या वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत. अनेक दिवसांनंतर काल ते सभागृहात गेले आणि थेट सत्ताधारी बाकांवर बसले. भाजपने मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप केलेले असताना नवाब मलिक हे महायुतीसोबत दिसल्याने विरोधकांनी भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं.
दिवसभर टीकेचा भडीमार झाल्यानंतर संध्याकाळी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांचा महायुतीत समावेश करू नये, अशी विनंती केली. त्यामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट नवाब मलिकांना दूर ठेवणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज अजित पवार गटाचे विधानपरिषद आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या पत्राबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही मलिक यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
“नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत आहे,” अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. एकीकडे नवाब मलिक यांना दूर ठेवण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली असताना मिटकरी यांनी हे वक्तव्य केल्याने अजित पवार गटाकडून भाजपच्या भूमिकेला आव्हान दिलं जात आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या पत्राबद्दल नाराजी
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केल्याने अजित पवार गट नाराज झाला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी पत्र सार्वजनिक करण्याची गरज नव्हती. मी त्याबद्दल कालच खेद व्यक्त केला आहे. सध्या व्हॉट्सअॅप आणि फोनचा जमाना आहे. यावरही बोलता आलं असतं, खासगीतही बोलता आलं असतं,” असं मिटकरींनी म्हटलं आहे.
नवाब मलिक प्रकरणाबद्दल पुढेल बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “सभागृहात कोणी कुठे बसायचं, याबाबतचा निर्णय सरकारच घेत असतं. नवाब मलिक जर सत्ताधारी बाकावर बसले होते, तर त्यांची तिथं बसण्याची व्यवस्था नक्की कोणी केली होती, याच्या तळाशीही पत्रकार बांधवांनी गेलं पाहिजे. याबाबत विधानसभा अध्यक्ष अधिकृत माहिती देऊ शकतील. आमच्याकडे राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांचं प्रतिज्ञापत्र आहेत. नवाब मलिक यांचंही प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहे. नवाब मलिक हे पक्षाचे नेते आहते आणि पक्षही त्यांच्यासोबत आहे.”
काय होतं फडणवीसांचं पत्र?
‘सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा,’ अशा कॅप्शनसह देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं होतं. “सध्या नवाब मलिक हे केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे,” अशी भूमिका पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रावर स्वत: अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.