Kirit Somaiya Video Case: किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

0

मुंबई,दि.27: Kirit Somaiya Video Case: किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाने या व्हिडीओचे विश्लेषण केले आणि तो मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळले. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत. (Kirit Somaiya Video Case)

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश | Kirit Somaiya Video Case

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ एका स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडे सोपवण्यात आला असून त्यांनी तपास सुरु केला आहे. प्राथमिक आधारावर गुन्हे शाखेने संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क साधून व्हिडीओची मागणी केली. तपास यंत्रणेला किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडीओचे विश्लेषण केले आणि ते व्हिडीओ खरे असल्याचे आढळल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओने खळबळ

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी रात्री यासंदर्भात वृत्त दिले होते. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केल्याचेही आमच्या कानावर आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसंच अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here