सोलापूर,दि.१२: पुढील शिक्षणाच्या कागदपत्रांसाठी आलेल्या पीडितेवर अत्याचार केल्याच्या आणि तिला डांबून ठेवल्याच्या गंभीर प्रकरणात, आरोपी चिंगुबाई शिवहर भोसले आणि काजल भोसले यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सोलापूर सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
घटनेची पार्श्वभूमी
पीडित मुलगी तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे घेण्यासाठी तिची आत्या चिंगुबाई शिवहर भोसले हिच्या घरी आली होती. यावेळी आरोपी चिंगुबाई भोसले, तिचा नवरा शिवहर भोसले आणि मुलगी काजल भोसले या सर्वांनी मिळून पीडितेला बेदम मारहाण केली. त्याच वेळी शिवहर भोसले याने पीडितेच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला शेजारच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या कृत्यात चिंगुबाई आणि काजल यांनी मदत केली, तसेच पीडितेचे हातपाय बांधून तिला खोलीत डांबून ठेवले.
काही वेळाने बाहेरून आलेल्या मोठ्या आत्याने पीडितेची सुटका केली. पीडितेला असह्य वेदना होत असल्याने आरोपी शिवहर आणि चिंगुबाई तिला दवाखान्यात घेऊन जात होते. त्याच वेळी संधी साधून पीडितेने रस्त्यावरील लोकांकडे मदत मागितली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी तिला एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात नेले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शिवहर भोसले, चिंगुबाई भोसले आणि काजल भोसले यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६, ३४१, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयीन कामकाज
या प्रकरणात अटक टाळण्यासाठी चिंगुबाई भोसले आणि काजल भोसले यांनी सुरुवातीला सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने तो नामंजूर केला.
यानंतर आरोपींनी सोलापूरचे वकील निलेश जोशी यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती मेहेरोज अशरफ खान पठाण यांच्यासमोर झाली. वकील निलेश जोशी यांनी आरोपींच्या बाजूने केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि चिंगुबाई भोसले व काजल भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने उच्च न्यायालय, कोल्हापूर येथे वकील निलेश जोशी यांनी काम पाहिले.








