मुंबई,दि.2: एकही ब्राह्मण या देशातला नाहीये, आपण या देशाचे मूळ निवासी आहोत असे राजदचे नेते माजी आमदार यदुवंशकुमार यादव यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सध्या जातीनिहाय जनगणनेची जोरदार चर्चा चालू आहे. बिहारप्रमाणेच देशभरात या जनगणनेचे राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राजद अर्थात बिहारमधील सत्ताधारी आघाडीतील पक्षाचे माजी आमदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस यदुवंशकुमार यादव यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे. त्यांचं हे वक्तव्य व्हायरल होत असून त्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
यदुवंशकुमार यादव काय म्हणाले?
यदुवंश कुमार यादव यांनी बिहारच्या सुपौल भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर शनिवारी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. ब्राह्मण हे मूळचे भारतीय नाहीच, असा दावा त्यांनी केला असून त्यासाठी डीएनए चाचणीचाही संदर्भ त्यांनी दिला आहे.
“एकही ब्राह्मण या देशातला नाहीये. आपण या देशाचे मूळ निवासी आहोत. ब्राह्मण हे मूळचे रशियन आहेत. त्यांचं डीएनएचं टेस्टिंग झालं. एकही ब्राह्मण या देशाचा नाहीये. ते रशियातून इथे आले आणि आपल्याला एकमेकांमध्ये भांडायला लावून आपल्यावर राज्य करत आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे यांना रशियातून पळवून लावलं गेलं, तसंच त्यांना आता आपण इथूनही पळवून लावायला हवं”, असं यदुवंशकुमार यादव म्हणाले.
संयुक्त जनता दलाकडून टीका
दरम्यान, राजद नेत्याच्या या विधानानंतर आता त्यांचाच सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या संयुक्त जनता दलाकडून टीका करण्यात आली आहे. जदयुचे प्रवक्ते अभिषेक कुमार झा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “राजदच्या नेत्यांनी केलेलं विधान वादग्रस्त आहे. परशुराम रशियातून आले होते की इतर कोणत्या देशातून? फक्त चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी अशी विधानं केली जात आहेत. राजदनं अशा नेत्यांविरोधात कारवाई करायला हवी”, असं अभिषेक कुमार झा म्हणाले आहेत.