Home देश दिल्लीतील अमानुष लाठीमाराचा निषेध: २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा ‘महाराष्ट्र बंद’

दिल्लीतील अमानुष लाठीमाराचा निषेध: २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा ‘महाराष्ट्र बंद’

0

मुंबई,दि.२२: दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या बंदमध्ये भाजपेत्तर विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

‘जनरल डायर’शी तुलना: दिल्ली पोलिसांनी आंदोलक तरुणांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचा तीव्र शब्दांत निषेध करत आंबेडकर म्हणाले, “दिल्लीत जणू जनरल डायर पुन्हा जिवंत झाला आहे.”

NEET परीक्षेतील घोळ कायम: नीटची फेरपरीक्षा झाली असली तरी त्यात अद्याप अनेक त्रुटी आहेत. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून, सरकारच्या कारभारामुळे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारवर तीव्र पलटवार: सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना ‘आतंकवादी’ म्हटल्याच्या विधानावर संताप व्यक्त करत आंबेडकर म्हणाले, “आंदोलक नाही, तर हे सरकारच ‘आतंकवादी’ आहे.” तसेच मुंबईतील आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे बेकायदेशीर असून ते न्यायालयात टिकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

आरएसएसवर निशाणा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) लोकशाही मानत नसून ‘ठोकशाही’वर विश्वास ठेवतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शांततापूर्ण बंदचे आश्वासन

“हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने पार पाडला जाईल. कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ दिली जाणार नाही आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा बंद शांततेत पार पडेल,” असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.