मुंबई,दि.९: गणेशोत्सवानंतर आगामी नवरात्रोत्सवाच्या (Navratri festival) पार्श्वभूमीवर गरब्यातील प्रवेशावरून नवा वाद समोर आला आहे. लव्ह जिहादचा (Love Jihad) मुद्दा उपस्थित करत गरबा मंडपांमध्ये मुस्लिमांना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी काही संघटनांसह आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
अमृता फडणवीस यांच्या मते, आपले सण-उत्सव हे सर्वसमावेशक (inclusive) स्वरूपाचे आहेत. जर एखादी मुस्लिम व्यक्ती गरब्यामध्ये सहभागी होऊन शांततेने व नियमांचे पालन करून सणाचा आनंद घेत असेल, तर त्यात काहीही गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नितेश राणे यांचे विधान आणि पार्श्वभूमी
काही मुस्लिम युवक हिंदू नावाने, कपाळावर टिळा लावून गरबा प्रांगणात प्रवेश करतात आणि हिंदू महिलांची फसवणूक करतात, असा दावा करत सुरक्षेच्या कारणास्तव मुस्लिमांना गरब्यामध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती. या विधानाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी उत्सवातील सर्वसमावेशकतेवर भर दिला.
सार्वजनिक सण नियमांच्या चौकटीतच साजरे व्हावेत
गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या (DJ) वापरावरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. सण-उत्सव साजरे करताना शासन आणि न्यायालयाच्या नियमावलीचे (rules and regulations) काटेकोर पालन झाले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर धर्माचे पालन घरात करणे योग्य असले, तरी सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करताना आसपासच्या रहिवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.








