मुंबई,दि.3: Vajramuth: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार निवृत्त झाल्यानंतर आता त्याचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवरही होत असल्याचं दिसून येतंय. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, पण शरद पवारांनी या निर्णयाचा पुनर्विचार करायला दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकासआघाडीवर काय परिणाम होणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महाविकासआघाडीच्या पुढच्या वज्रमूठ सभा रद्द झाल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रफुल पटेल यांनी मात्र शरद पवारांच्या राजीनाम्याचा आणि वज्रमूठ सभा रद्द व्हायचा काहीही संबध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गरमीच्या तडाख्यामुळे वज्रमूठ सभा टाळावी किंवा पोस्टपोन करावी, अशी चर्चा मुंबईतल्या सभेवेळीच स्टेजवर नेत्यांमध्ये झाली. सभा रद्द व्हायचा आणि पवार साहेबांच्या राजीनाम्याचा संबंध नाही. वज्रमूठ सभा आणि महाविकासआघाडीची चर्चा करायला आम्ही इथे बसलेलो नाही, असं प्रफुल पटेल म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा रद्द | Vajramuth
महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाली असून पुण्यासह कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथे नियोजित केलल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्यात जमा असल्याचं बोललं जातंय. पुण्यात 14 मे रोजी, कोल्हापुरात 28 मे रोजी, नाशिकला 3 जूनला तसेच 11 जूनला अमरावतीत नियोजित केलेल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्याचं वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत याचा कुठलाही परिणाम होणार नाही असे जरी महाविकास आघाडीचे नेते म्हणत असले तरी पुढील अंतर्गत कलह आणि मोठ्या नेत्यांची एकमेकांबद्दलची वक्तव्यं पाहता संविधान बचावासाठी आणि महाविकास आघाडीच्या मजबुतीसाठी घट्ट बांधली गेलेली वज्रमूठ सैल होताना दिसत आहे.
संभाजीनगर नागपूर आणि मुंबई त्या तीन ठिकाणी झालेल्या वज्रमूठ सभेत मोठी ताकद तिन्ही पक्षाने दाखवली असली तरी पुढील होणाऱ्या नाशिक, पुणे, अमरावती, कोल्हापूर या ठिकाणच्या चार वज्रमूठ सभांच नेमकं काय होणार? कोणी म्हणतंय पुण्यातील पुढील सभा पावसामुळे रद्द करण्याचा विचार केला जातोय, तर कोणी म्हणतंय उन्हामुळे पुढील पुण्याची सभा पुढे ढकलण्याचा विचार होतोय.