मुंबई,दि.४: Sharad Pawar: आत्मचरित्रात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. २०१९च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही झाला होता. ‘मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो’या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाने खमंग राजकीय चर्चा झाली होती. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती, असा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे र्सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’मध्ये कथन केला आहे.
शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार स्थापनेचा प्रयत्न… | Sharad Pawar
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर आमच्या पक्षात विचारविनिमय सुरू असतानाच शिवसेनेचे संजय राऊत यांनी माझी भेट घेतली होती. सत्तेत समान वाटय़ाचे वचन भाजप पाळण्याबद्दल त्यांना शंका होती. शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार स्थापनेचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याने शिवसेनेत भाजपच्या विरोधात खदखद अधिक वाढली होती. तेव्हाच राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही निवडक नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवाद झाला होता. मी या प्रक्रियेत सहभागी नव्हतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रस्तावावर आमच्या पक्षात विचारविनिमय झाल्यावर भाजपबरोबर जायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. राजकीय संभ्रम राहू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब घालायची असेही ठरले. संसदेचे अधिवेशन सुरू असताना मी मोदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.
शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती
‘आम्ही तुमच्याबरोबर यावे ही अपेक्षा कळत नकळत व्यक्त होत आहे. परंतु अशी राष्ट्रवादीची कोणत्याही प्रकारे इच्छा नसल्यानेच गैरसमज टाळण्याकरिता मी मुद्दाम भेटीला आलो आहे’ असे मी मोदींना स्पष्टपणे सांगितले होते. मोदींनी बारामतीमध्ये माझी अनाठायी स्तुती केली होती. तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असावी यासाठी मोदी अनुकूल होते, अशी माहिती पवारांनी पुस्तकात दिली आहे. यामुळेच मी मोदी यांना भेटून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकीय सख्य होऊ शकत नाही हे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र त्याच वेळी भाजपबरोबर जुळवून घ्यावे अशी इच्छा असणारे काही नेते राष्ट्रवादीत होते याची कबुली पवारांनी दिली आहे. राष्ट्रवादीने भाजपबरोबर जावे अशी काही नेत्यांना वाजपेयी सरकारच्या काळापासून वाटत होते. त्या वेळी राष्ट्रवादी पक्ष नवीन होता. राष्ट्रवादीने तेव्हाही भाजपबरोबर यावे म्हणून प्रयत्न झाले होते. तेव्हाही चर्चेत सहभागी झालो नव्हतो, असे पवार यांनी म्हटले आहे.