मुंबई,दि.३: शरद पवारांच्या आरोपांना उद्धव ठाकरे सडेतोड उत्तर देणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकातून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दोनदा जाणे हे पचनी पडणारे नव्हते असं शरद पवारांनी पुस्तकात लिहिलं आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे या सर्व प्रश्नांवर आणि शंकावर सडेतोड उत्तर देतील. सामनातून त्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होईल असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
शरद पवारांच्या आरोपांना उद्धव ठाकरे सडेतोड उत्तर देणार
खासदार संजय राऊत म्हणाले की, मी पुस्तक पूर्ण वाचले नाही. आत्मचरित्रात अनेक गोष्टी येत असतात. त्या व्यक्तिगत भूमिका असतात. लोकांच्या भूमिका नसतात. या विषयावर माझे उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. लवकरच या सर्व घडामोडींवर सामनातून प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होतेय. तुम्हाला या सर्व प्रश्नांची किंवा शंका उत्पन्न झालेत त्यावर सडेतोड उत्तरे मिळतील असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच एका अनेक वर्ष राजकीय प्रवास, संघर्ष केलेल्या नेत्याची ती आत्मकथा आहे. त्यात काही आक्षेपार्ह असेल तर जे लोक असतील ते उत्तर देतील. प्रत्येकाची वेगळी बाजू आणि भूमिका असते. ती बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. शरद पवारांबाबत ज्या भूमिका आहेत ती उद्धव ठाकरे मुलाखतीतून मांडणार आहेत. त्यात सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या मनातील अस्वस्थता जाणवत होती. भाकरी फिरवण्याची वेळ आलीय हे त्यांनी विधान केले. पण त्यांनी तवाच फिरवला असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात भाष्य केले
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात भाष्य केले आहे. विशेषतः उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात न जाण्यावर पवारांची नाराजी होती, हे या पुस्तकातून समोर आले आहे. याबाबत पवारांनी लिहिले आहे की, उद्भवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते. बाळासाहेबांसमवेतची संवादातील सहजता उद्भवशी बोलताना नव्हती. राज्याच्या प्रमुखाला उद्या काय होऊ शकेल त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचे राजकीय चातुर्य हवे. याची कमतरता जाणवत होती. हे टाळता आले असते असं शरद पवारांनी म्हटलं.