नवी दिल्ली,दि.18:Election Survey: टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्वेक्षणातून NDA साठी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार? याच्या शक्यता वर्तवण्यास आतापासूनच सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या सर्वेक्षणांतून 2024 लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election 2024) कोणता पक्ष देशात सरकार स्थापन करणार? याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, टाईम्स नाऊ ईटीजीनंही सर्वेक्षण करून अंदाज बांधले आहेत. टाइम्स नाऊ नवभारतनं केलेल्या सर्वेक्षणात सत्ताधारी एनडीए (NDA) सरकारसाठी धोक्याची सूचना देण्यात आली आहे.
टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, एनडीएला 2019 च्या तुलनेत यावेळी मतांच्या टक्केवारीत खूप नुकसान सहन करावं लागू शकतं. मात्र, असं असलं तरिही देशात 2024 लोकसभा निवडणुकांनंतर तिसर्यांदा एनडीएचंच सरकार स्थापन होईल, असा निष्कर्षही सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
सर्वेक्षणात एनडीएला… | Election Survey
ईटीजी रिसर्चसोबत टाईम्स नाऊनं केलेल्या सर्वेक्षणात एनडीएला 42.60 टक्के मतं, तर विरोधकांच्या I.N.D.I.A ला 40.20 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 45 टक्के मतं मिळाली होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र एनडीएची मतांची टक्केवारी कमी होणार असल्याचं सर्वेक्षणातून सांगण्यात आलं आहे. 2019 मध्ये एकट्या भाजपला 37 टक्के मतं मिळाली होती, तर कॉंग्रेसला फक्त 19 टक्के मतं मिळाली होती.
कोणाला किती जागा?
सर्वेक्षणानुसार, एनडीएला यावेळी 236 ते 296 जागा मिळतील, तर I.N.D.I.A. 160-190 जागा मिळू शकतात.
दरम्यान, गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत यंदा मात्र काँग्रेसचं समीकरण काहीसं बदललेलं आहे. यावेळी काँग्रेसला विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. या विरोधी पक्षांमध्ये अनेक अशा पक्षांचा समावेश आहे, ज्यांचं देशातील अनेक राज्यांमध्ये स्वतःचं सरकार आहे. 2019 मध्ये केवळ 52 जागांवर मर्यादित राहिलेल्या काँग्रेसच्या 2014 च्या तुलनेत 8 जागांची वाढ झाली आहे. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये देशातील सर्वात जुन्या पक्षांची मतं 20 टक्क्यांच्या जवळपास राहिली. गेल्या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर लोकसभेच्या अशा एकूण 192 जागा होत्या, ज्यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली होती.
टाईम्स नाऊ नवभारत आणि ईटीजीनं केलेल्या सर्वेक्षणात गेल्या वेळीप्रमाणे उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, यावेळीही विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबतच बसपाचीही परिस्थिती गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या निवडणुका झाल्या तर कोण बाजी मारणार याबाबत केलेल्या सर्वेक्षणात भाजपला 70 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, सर्वेक्षण हे केवळ अंदाज आहेत. प्रत्यक्ष निकाल यापेक्षा वेगळे असण्याची पूर्ण शक्यता आहे. सर्वेक्षणात निवडणुकीपूर्वी जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून चित्र स्पष्ट होईल.