सोलापूर,दि.३०: मराठा आरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आक्रोश मोर्चा’त सहभागी झाल्याप्रकरणी सोलापूरमधील चार आमदारांसह ३० आरोपींनी न्यायालयात हजेरी लावली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर ही सुनावणी झाली. न्यायालयाने बजावलेल्या समन्समुळे आमदारांसह आरोपी प्रत्यक्ष हजर राहिले होते.
नेमके प्रकरण काय?
४ जुलै २०२१ रोजी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने या मोर्चाला परवानगी नाकारली होती. प्रशासनाची परवानगी नसतानाही समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांनी मोर्चा काढला.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी तक्रार दाखल केली होती. सहभागी झालेल्यांमध्ये आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.
न्यायालयीन प्रक्रिया
समन्स बजावण्यात आल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे आणि राजेंद्र राऊत यांच्यासह एकूण ४८ आरोपींपैकी ३० जण न्यायालयात हजर झाले.
या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. संतोष न्हावकर, सचिन साखरे, राहुल रूपनर, बाबासाहेब जाधव, राज म्हात्रे आणि अजिंक्य जाधव यांनी काम पाहिले, तर सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. संतोष पाटील यांनी बाजू मांडली.








