Home आंतरराष्ट्रीय मुस्लीम समाजाचा उल्लेख करत सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

मुस्लीम समाजाचा उल्लेख करत सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

0

मुंबई,दि.३०: अमेरिकेतील (America) न्यूयॉर्क येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ (‘एक जग, एक मानवता’) परिषदेत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “भारतामध्ये मुस्लिमांचे अस्तित्व नसावे असे वाटणारा व्यक्ती स्वतःला हिंदू मानूच शकत नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी या जागतिक व्यासपीठावर मांडले. विविध धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितले की, सर्व मार्ग शेवटी एकाच ईश्वराकडे जातात हा भाव जपणे हीच हिंदू असण्याची खरी ओळख आहे. मानवी मूल्यात कोणताही भेदभाव न मानणे आणि प्रत्येकाचा आदर करणे हाच मानवतेचा मुख्य पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारत आणि अमेरिकेच्या मूळ रचनेतच विविधता

मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) तर्फे आयोजित या कार्यक्रमात भागवत यांनी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील समानतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “अमेरिका ‘बहुविधता’ मानतो, तर भारत ‘विविधतेतील एकता’ जपतो. या दोन्ही गोष्टी दोन्ही राष्ट्रांच्या मूलभूत विचारसरणीत (डीएनएमध्ये) बसलेल्या आहेत.”

स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, “राष्ट्र म्हणजे केवळ एक जमीन किंवा सीमा नसून, जागतिक व्यवस्थेत प्रत्येक देशाला एक विशिष्ठ भूमिका पार पाडायची असते. ‘विविधतेतील एकता’ स्वतः अनुभवणे आणि जगाला त्याची अनुभूती करून देणे हेच भारताचे ध्येय आहे.”

मार्ग वेगळे, पण मानवता एकच

आपल्या भाषणात भागवत यांनी मानवी मूल्यांवर विशेष भर दिला. “सत्य एकच असून ते मांडण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. धर्म आणि उपासना पद्धती भिन्न असल्या तरी शेवटी संपूर्ण मानवी समाज एकच आहे. धार्मिक शिस्त आणि ईश्वरप्राप्तीसाठी आपापल्या विधींचे पालन करणे गरजेचे असले, तरी अंतिम ध्येय मानवतेचे रक्षण हेच असायला हवे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच, भूतकाळातील चुकांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा समाजाला योग्य संस्कार आणि शिक्षण मिळत नाही, तेव्हा समाजाची दिशाभूल होते. इतिहास साक्षी आहे की, अशाच असंघटितपणामुळे भारताला परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला आणि मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे समाजाला एकसंध ठेवणे ही काळाची गरज आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.