जालना,दि.३०: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. नोंद सापडलेल्या सुमारे ५८ लाख कुणबी बांधवांच्या सर्व सोयरधायऱ्यांना आणि पात्र मराठा समाजाला तत्काळ कुणबी प्रमाणपत्रे तसेच जात वैधता प्रमाणपत्रे देण्यात यावीत, या मागणीवर ते ठाम आहेत. “हे आमचे अंतिम आंदोलन असून, आता प्रशासनाला कोणताही अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही,” असा थेट इशारा देत त्यांनी १२ सप्टेंबर रोजी मुंबईतील भव्य आंदोलनाची अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगितले.
समाजाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षण आता अगदी अंतिम टप्प्यात आले आहे, त्यामुळे जनतेने सरकारवर अवलंबून राहणे सोडून द्यावे. १२ सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर ४० ते ४५ लाख दुचाकींसह मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करेल. आंदोलन शांततेत आणि पोलिसांशी कोणताही संघर्ष न करता करायचे आहे, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. तसेच मुंबईतील मराठा बांधवांनी बाहेरून येणाऱ्या आंदोलकांच्या जेवणाची व राहण्याची सोय करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
उपोषणादरम्यान अत्यंत भावुक होत जरांगे म्हणाले, “मी समाजाशी कधीही प्रतारणा करणार नाही. गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती देईन; पण मागे हटणार नाही. माझ्या मृत्यूनंतरही ही लढाई थांबवू नका आणि माझा देह असाच मुंबईला घेऊन जा.”








