Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहाला जनतेकडून मिळालेला हा ‘अभूतपूर्व’ प्रतिसाद: संजय राऊत

मुख्यमंत्र्यांच्या आवाहाला जनतेकडून मिळालेला हा ‘अभूतपूर्व’ प्रतिसाद: संजय राऊत

0
मुख्यमंत्र्यांच्या आवाहाला जनतेकडून मिळालेला हा 'अभूतपूर्व' प्रतिसाद: संजय राऊत

नाशिक,दि.२९ : आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे नियोजन केले जात आहे. याच तयारीची व प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच नाशिक दौरा केला. या दौऱ्यादरम्यान आयोजित एका विशेष कार्यक्रमावरून आता शिवसेना (ठाकरे गट) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे.  

रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ अन् संजय राऊतांचा टोला  

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिकमधील कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र निशाणा साधला. या व्हिडिओमध्ये सभागृहातील अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून येत आहे.  

हा व्हिडिओ पोस्ट करताना राऊत यांनी उपरोधिक शब्दांत म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या जनतेला कुंभमेळ्याच्या निमित्ताने आमंत्रित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहाला जनतेकडून मिळालेला हा ‘अभूतपूर्व’ प्रतिसाद आहे! लोकांचा या सरकारवर जराही विश्वास उरलेला नाही, तरीसुद्धा EVM च्या जोरावर मते मिळवून हे सत्तेत येतात.” राऊतांच्या या टीकेवर आता भाजप आणि फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभमेळ्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त करत, खर्चाचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.  

विरोधकांच्या या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “कुंभमेळ्याशी संबंधित सर्व प्रकल्पांची माहिती आधीच जनतेसमोर उपलब्ध करून देण्यात आली असून काहीही लपवण्यात आलेले नाही. ज्यांच्या स्वतःच्या मनात आणि वर्तनात भ्रष्टाचार भरलेला आहे, त्यांनाच प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार दिसतो,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.  

सनातन आणि हिंदू धर्माशी जोडलेल्या सर्व आस्थेच्या ठिकाणांवर खोटे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे ही विरोधकांची रणनीती बनली आहे. मात्र, जनता सत्य जाणून असून विरोधकांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.