Home महाराष्ट्र राजकारणात नेते, पण डिजिटल जगतात तुकाराम मुंढेंची क्रेझ; ‘एंगेजमेंट रेट’मध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले...

राजकारणात नेते, पण डिजिटल जगतात तुकाराम मुंढेंची क्रेझ; ‘एंगेजमेंट रेट’मध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे

0

मुंबई,दि.२७: महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाडीच्या निर्णयांसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता सोशल मीडियाच्या जगातही आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. टीव्हीच्या पडद्यावर दररोज राजकीय नेत्यांची चर्चा रंगत असली, तरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर युझर्सचा मिळणारा प्रतिसाद (Engagement Rate) पाहिला, तर मुंढेंची लोकप्रियता राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अत्यंत कमी पोस्ट्स करूनही सर्वाधिक प्रतिसाद मिळवणारा एक मजबूत ‘डिजिटल ब्रँड’ म्हणून मुंढे सध्या इन्स्टाग्राम आणि ‘X’ (ट्विटर) वर अव्वल स्थानावर आहेत.

इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढेंची घौडदौड

फॉलोअर्स आणि प्रतिसादाच्या बाबतीत मुंढेंनी राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या नेत्यांनाही मागे टाकले आहे. इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढे यांचे ३४.१५ लाख (३.४१ मिलियन) फॉलोअर्स आहेत. त्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २९.०२ लाख, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे १३.०१ लाख फॉलोअर्स आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या ६० दिवसांत मुंढेंनी अवघ्या १३ पोस्ट्स शेअर केल्या असून त्यांचा एंगेजमेंट रेट तब्बल २०.३५ टक्के आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (९७ पोस्ट्स, ०.५०% एंगेजमेंट) आणि एकनाथ शिंदे (२५ पोस्ट्स, ०.०४% एंगेजमेंट) या नेत्यांच्या तुलनेत मुंढेंच्या पोस्ट्सवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि लाईक्सचा पाऊस पडताना दिसतो.

‘X’ वर कमी फॉलोअर्स, पण प्रतिसादात सर्वात पुढे

‘X’ (ट्विटर) वर राजकीय नेत्यांच्या तुलनेत मुंढेंची फॉलोअर्स संख्या कमी असली, तरी तिथला संवाद आणि लोकांचा सहभाग यात मुंढेच आघाडीवर आहेत.

 तुकाराम मुंढे: २.६५ लाख फॉलोअर्स — ४.६२% एंगेजमेंट रेट

 देवेंद्र फडणवीस: ५.०२ लाख फॉलोअर्स — ०.०७% एंगेजमेंट रेट

 एकनाथ शिंदे: ३.८७ लाख फॉलोअर्स — ०.०४% एंगेजमेंट रेट

सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या शर्यतीतही वर्चस्व

केवळ राजकारणीच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर लोकप्रिय सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्येही तुकाराम मुंढे यांचाच प्रभाव सर्वाधिक आहे. इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत मुंढेंपाठोपाठ समीर वानखेडे (८.४७ लाख) आणि विश्वास नांगरे पाटील (६.१२ लाख) यांचा क्रमांक लागतो. परंतु एंगेजमेंट रेटच्या बाबतीत मुंढेंचा २०.३५% प्रतिसाद हा नांगरे पाटील (३.६०%) आणि वानखेडे (३.२०%) यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.

(टीप: तुकाराम मुंढे यांचे अधिकृत व्हेरिफाइड फेसबुक पेज उपलब्ध नसल्याने या तुलनेत फेसबुकच्या डेटाचा समावेश केलेला नाही.)

केवळ फॉलोअर्स नव्हे, लोकांचा विश्वास महत्त्वाचा

केवळ फॉलोअर्सची संख्या मोठी असणे म्हणजे खरी लोकप्रियता नव्हे, तर लोक तुमच्या कामाला आणि विचारांना किती प्रतिसाद देतात हे महत्त्वाचे असते. सध्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागात धडक कारवाया करणाऱ्या मुंढेंच्या प्रत्येक निर्णयाला नागरिक सोशल मीडियावर उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत. राजकीय नेत्यांच्या प्रचंड प्रसिद्धीच्या काळात एका सनदी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर निर्माण केलेली ही क्रेझ खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.