Home राजकारण फोटोच्या वादात भाजपचा खेळ, विकासाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केवळ!

फोटोच्या वादात भाजपचा खेळ, विकासाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केवळ!

0

सोलापूर,दि.२७: “लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, देशातून विरोधी पक्षच नष्ट करायचा ही सत्ताधारी भाजपची मानसिकता बनली असून ती तातडीने बदलायला हवी,” अशी जोरदार टीका ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्रातील सोलापूर, नांदेड आणि धुळे महापालिकांमध्ये ‘एमआयएम’ हा प्रमुख विरोधी पक्ष असूनही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत नांदेड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याचा निकाल धुळे आणि सोलापूरच्या राजकारणावरही प्रभाव टाकेल, असा दावा त्यांनी केला.

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:

‘एसआयआर’चा घाट आणि मतदार घटवण्याचा कट: मुस्लिम समाज भाजपला मतदान करणार नाही हे स्पष्ट असल्याने, त्यांची मते कमी करण्यासाठी ‘एसआयआर’ (SIR) चा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

इतिहासाच्या वादातून राजकीय पोळी: महागाई आणि बेरोजगारीसारख्या मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजप औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या फोटोचा वाद निर्माण करत आहे. लोकसभेत दाखवण्यात आलेल्या मूळ संविधानाच्या प्रतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत टिपू सुलतान यांचेही चित्र आहे. हिंमत असेल तर संविधानातून तो फोटो हटवून दाखवावा, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

शिक्षणापेक्षा इतर खर्चावर भर: देशात महागाई गगनाला भिडली असून शाळांची अवस्था दयनीय आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी (सुमारे ३० हजार कोटी) खर्च केले जातात, पण शिक्षण व्यवस्थेसाठी मात्र पुरेसा निधी दिला जात नाही. कुंभमेळ्याच्या निधीतील किमान १ टक्का रक्कम शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी वापरावी.

सामाजिक उपक्रम व पक्षाचा विस्तार: पक्षाकडून सोलापुरात एक शाळा व एक दवाखाना उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला जाईल. तसेच, पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हाध्यक्षांची निवड पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी स्वतः करणार आहेत.

या पत्रकार परिषदेला शौकत पठाण, महापालिकेतील एमआयएमच्या गटनेत्या वहिदाबानो शेख, हत्तुरे, भागानगरी, मोगल, हुंडेकरी, जहागीरदार यांसह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.