Home महाराष्ट्र लाडकी बहीण योजना: महिलांच्या बँक खात्यात नक्की किती रक्कम जमा होणार?

लाडकी बहीण योजना: महिलांच्या बँक खात्यात नक्की किती रक्कम जमा होणार?

0

मुंबई,दि.२५: महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते. दरम्यान, रक्षाबंधनाचे औचित्य साधून या महिन्यात महिलांना ३००० रुपये मिळतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत शासनाकडून अजून कोणताही अधिकृत निर्णय किंवा स्पष्टीकरण जारी करण्यात आलेले नाही.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये रक्षाबंधनादरम्यान जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्र वितरीत करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही जुलै आणि ऑगस्टचा थकीत अथवा एकत्र हप्ता मिळून ३००० रुपये खात्यात वर्ग केले जातील, असा अंदाज बांधला जात आहे.

निधी वितरणासाठी शासनाचा नवा जीआर

लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमधून ३४४.७४ कोटी रुपयांची रक्कम महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे.

योजनेच्या सुरुवातीपासूनच निधीचा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या निधीचा वापर केला जात आहे. यापूर्वी जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, तर एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागातून वळवण्यात आला होता. या सततच्या निधी वळवण्यामुळे मूळ विभागांच्या इतर कल्याणकारी उपक्रमांवर आणि योजनांवर परिणाम होत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.