पंढरपूर, दि. २१: राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. तसेच राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समिती सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी आणि यात्रेदरम्यान लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली आहे. आपण सर्वजण येथे वारकरी भावनेने येतो. सर्वसामान्य वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने व कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होऊन वारकऱ्यांना लवकर दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पंढरपूर वारीच्या नियोजनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला असून, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
महाराष्ट्रातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन राज्यात चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांना तातडीने मदत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
कार्तिकी यात्रेच्या नियोजनात जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, सूचनांची तत्परतेने अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्या कामाचे कौतुक केले. या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी तत्परतेने आणि धडाडीने निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पास त्यांना प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी २०२७’ चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले, तर आभार कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मानले.
कार्तिकी यात्रेत सुधाकर शिंदे दाम्पत्य मानाचे वारकरी
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे (वय ५८) व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे (वय ५१) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड झाली.
शिंदे दाम्पत्य गेल्या ११ वर्षांपासून नियमित पंढरपूरची वारी करत असून, त्यांना सुशील व प्रणव हे दोन मुलगे आणि गायत्री व संस्कृती या दोन मुली आहेत. सागर महाराज वाशिमकर यांच्या मार्गदर्शनाखालील वारकरी परंपरेशी जोडलेले हे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून माळकरी असून, शेती व्यवसाय सांभाळत भक्तिभावाने वारकरी संप्रदायाची परंपरा जपत आहेत.








