सोलापूर,दि.१९: २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. ज्या ‘बॉम्बार्डियर लिअरजेट ४५’ (नोंदणी क्रमांक VT-SSK) विमानाला हा अपघात झाला, ते ‘व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (VSR Ventures Pvt Ltd) या कंपनीचे होते. या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत या कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. इतकंच नाही तर, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हीएसआर कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंह यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही केला होता.
मात्र, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान अजित पवारांच्या विमान प्रवासाबाबतची अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे समोर आली असून, त्यातून एक वेगळेच चित्र स्पष्ट होत आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील विशेष वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, अजित पवारांच्या निधनापूर्वीच्या १४ महिन्यांच्या कालावधीतील म्हणजेच ८ डिसेंबर २०२४ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यानच्या विमान प्रवासाचा सविस्तर डेटा समोर आला आहे. या आकडेवारीनुसार, या १४ महिन्यांच्या काळात अजित पवारांनी देशभरात आणि राज्यात एकूण १०४ वेळा चार्टर विमानाने प्रवास केला होता. यातील तब्बल ८५ प्रवास त्यांनी केवळ ‘व्हीएसआर’ कंपनीच्याच विमानातून केले होते, तर इतर कंपन्यांच्या विमानांना त्यांनी केवळ १९ वेळा पसंती दिली होती. यावरून स्पष्ट होते की, अजित पवारांनी त्यांच्या एकूण विमान प्रवासापैकी सुमारे ८२ ते ८३ टक्के वेळा स्वतःहून व्हीएसआर कंपनीच्या विमानांनाच प्राधान्य दिले होते.
रोहित पवारांनी एका छायाचित्राचा आधार घेत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी मुंबई तसेच बारामती पोलीस ठाण्यात जाऊन पाठपुरावा केला होता. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, केवळ अजित पवारच नव्हे तर स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांनीही यापूर्वी अनेकदा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला आहे. विशेषतः शरद पवारांचे मुंबई ते दिल्ली दरम्यानचे अनेक प्रवास याच कंपनीच्या विमानातून झाले आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असले आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी, समोर आलेली ही अधिकृत आकडेवारी आणि वस्तुस्थिती रोहित पवारांच्या दाव्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे चित्र मांडत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.








