मुंबई,दि.२०: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अकवान’ चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली असून, आज (२० नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास हे वादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील गोपाळपूर परिसरात या वादळाचा थेट लँडफॉल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे १९ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या पुढील चार आठवड्यांच्या कालावधीत देशातील तब्बल आठ राज्यांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाच्या सरी कोसळण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, हे वादळ ताशी सुमारे १९ किलोमीटर वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे. गुरुवारी रात्री उशिरा साडेअकराच्या सुमारास ‘अकवान’ वादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून आग्नेयेस १७० किलोमीटर, विशाखापट्टणमपासून पूर्व-आग्नेयेस २०० किलोमीटर, तर ओडिशातील गोपाळपूरपासून दक्षिणेस २४० किलोमीटर अंतरावर घोंघावत होते. हे चक्रीवादळ जमिनीवर धडकताना किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर इतका प्रचंड राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वाऱ्याचे झोत ताशी ९० किलोमीटरचा टप्पाही गाठू शकतात.
सध्या विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवर ताशी २० ते ३० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला आहे. विशाखापट्टणम शहरावरील थेट चक्रीवादळाचा मोठा धोका टळला असला, तरी उत्तर आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता कायम आहे. संभाव्य धोका लक्षात घेता ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागात प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या वातावरणीय बदलाचे पडसाद महाराष्ट्राच्या हवामानावरही उमटणार आहेत.
भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा सविस्तर हवामान अंदाज प्रसिद्ध केला असून, त्यानुसार १९ ते २६ नोव्हेंबर या पहिल्या टप्प्यात ओडिशा आणि गांगेय पश्चिम बंगालच्या खोऱ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. याच काळात झारखंड, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्येही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर दक्षिण भारताकडे सरकणार असून केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटकातील काही भाग आणि आंध्र प्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
महाराष्ट्राच्या दृष्टीने ३ ते १० डिसेंबर हा तिसरा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या कालावधीत दक्षिण भारतातील अनेक भागांसह कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे ढग दाटून येण्याची व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच दरम्यान उत्तरेकडील जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही पाऊस आणि हिमवर्षावाचे संकेत आहेत. तर १० ते १७ डिसेंबर या शेवटच्या टप्प्यात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक तसेच जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पावसाचे वातावरण कायम राहील. एकीकडे दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असताना, दुसरीकडे उत्तर भारतात मात्र कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचे संकट अधिकच गडद होत चालले आहे.








