Home अर्थकारण साखरेचे वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

साखरेचे वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

0

मुंबई,दि.२५: देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतीत झालेल्या झपाट्याने वाढीमुळे केंद्र सरकारने साखरेच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ग्राहकांना वाढत्या दराचा फटका बसू नये आणि बाजारात साठेबाजीला आळा बसावा, यासाठी कच्च्या साखरेच्या आयातीशी संबंधित नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

सरकारने टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत आयात होणाऱ्या कच्च्या साखरेसाठी प्रक्रिया आणि विक्रीची मुदत निश्चित केली आहे. आयात केलेली कच्ची साखर आता दोन महिन्यांच्या कालावधीत पांढऱ्या साखरेत रूपांतरित करून देशांतर्गत बाजारात विकणे बंधनकारक असेल.

साखर साठवून ठेवण्यास आळा

यापूर्वी आयात केलेल्या कच्च्या साखरेवर योग्य कालावधीत प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत बाजारात आणण्याची अट होती. मात्र, नव्या नियमामुळे आयात केलेल्या कच्च्या साखरेला दीर्घकाळ साठवून ठेवण्याची शक्यता कमी होणार आहे.

केंद्राच्या या निर्णयामागे साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ न देणे आणि आयात केलेला साठा बाजारात लवकर उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी पूर्ण करण्यासही मदत होण्याची शक्यता आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन आयातीला मंजुरी

देशातील साखरेच्या उपलब्धतेत वाढ करण्यासाठी सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय शीतपेय आणि आईस्क्रीम उत्पादक, व्यापारी तसेच घाऊक ग्राहकांसाठी साखरेच्या साठ्यावर मर्यादा लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, देशातील काही राज्यांनीही केंद्राकडे साखरेची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महिनाभरात साखरेच्या दरात तब्बल 29 टक्के वाढ

सरकारी आकडेवारीनुसार, सध्या देशभरातील साखरेचा सरासरी किरकोळ दर 63.05 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. महिनाभरापूर्वी हाच दर 48.73 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात साखरेच्या किरकोळ दरात सुमारे 29 टक्क्यांची वाढ झाली आहे.

काही ठिकाणी साखरेचा कमाल किरकोळ दर 75 रुपये प्रति किलोपर्यंत नोंदवण्यात आला आहे. अन्न सचिव संजीव चोप्रा यांच्या माहितीनुसार, कारखान्यांमधून बाजारात येणाऱ्या साखरेचा दरही अवघ्या सात ते दहा दिवसांत 47-48 रुपयांवरून सुमारे 62 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे.

दरवाढीमागे नेमकं कारण काय?

साखरेची किंमत वाढत असली तरी देशात साखरेचा तुटवडा असल्याचे साखर उद्योगाचे म्हणणे नाही. इंडियन शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांच्या मते, सध्याचा साठा देशाची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे.

हवामानातील बदलामुळे उसाच्या उत्पादनावर झालेला परिणाम, वाढलेले गाळपाचे दर आणि उत्तर प्रदेशातील काही ऊस वाणांशी संबंधित अडचणी यामुळे साखरेच्या किमतीवर दबाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

सरकारच्या नव्या नियमांमुळे आयात केलेली कच्ची साखर बाजारात लवकर उपलब्ध होईल आणि साठेबाजीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या वाढत्या दरांना काही प्रमाणात लगाम लागतो का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.