पुणे,दि.२३: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गुंज’ (Chatron Ki Gunj) या विशेष कार्यक्रमाची सांगता अत्यंत जल्लोषात आणि उत्साही वातावरणात झाली. दिवसभरात COEP कॉलेज परिसरामध्ये काँग्रेस आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय तणावानंतर, संध्याकाळी सोहळ्याचा शेवट मात्र एका संगीतमय वातावरणात झाला.
विद्यार्थिनींशी थेट संवाद आणि राजकीय टीका
गडचिरोली, पालघर आणि पुण्यासह राज्यभरातील विविध भागांतून आलेल्या हजारो तरुण विद्यार्थिनींनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. राहुल गांधी यांनी Gen-Z आणि तरुण विद्यार्थिनींच्या शिक्षण, सुरक्षा आणि रोजगाराशी संबंधित विविध समस्या ऐकून घेतल्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत राहुल गांधी यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली.
संगीताच्या तालावर नेत्यांचा ठेका
संवाद आणि भाषण सत्र संपल्यानंतर आयोजकांकडून उपस्थितांसाठी एका खास कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. स्टेजवर बँडने प्रसिद्ध ‘तु जाने ना…’ हे गाणे सादर करायला सुरुवात केली आणि संपूर्ण वातावरणात एकच उत्साह संचारला. गाण्याचे सूर कानावर पडताच मंचावरील आणि सभागृहात उपस्थित असणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते स्वतःला रोखू शकले नाहीत.
प्रणिती शिंदेंसह दिग्गज नेत्यांची साथ
गाण्याच्या तालावर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि विशाल पाटील यांनी अतिशय उत्साहात डान्स करायला सुरुवात केली. त्यांना माजी मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही तितक्याच आवेशाने साथ दिली.
दिवसभराच्या कडक राजकीय वातावरणा नंतर नेत्यांचा हा अनौपचारिक, मनमोकळा आणि संगीतमय अंदाज उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. सध्या काँग्रेसच्या या दिग्गजांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून राजकीय वर्तुळातही याचीच चर्चा रंगली आहे.








