मुंबई,दि.२६: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या बदलत्या राजकीय हालचाली सध्या महाराष्ट्राच्या पटलावर चर्चेचा विषय ठरत आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी वाढता संपर्क आणि थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी असलेला संवाद यामुळे रोहित पवार काँग्रेसचा हात धरणार का, याविषयी तर्क-वितर्कां उधाण आले आहे. दिल्लीत राहुल गांधींची भेट असो वा त्यांचे जाहीर समर्थन, सत्ताधारी अजित पवार गटानेही त्यांच्या या भूमिकेवर वारंवार निशाणा साधला आहे.
मात्र, या सर्व चर्चा रोहित पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत. “महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्षनेता उपलब्ध नसल्याने आम्हाला देशाच्या विरोधी पक्षनेत्याकडे मदतीची मागणी करावी लागते,” असे स्पष्टीकरण देत त्यांनी पक्षांतराच्या अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
या ३ प्रमुख घडामोडींमुळे चर्चांना बळ
राहुल गांधींना नागपूर आंदोलनाचे निमंत्रण: आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून रोहित पवार यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, स्वपक्षातील ज्येष्ठ नेत्यांऐवजी त्यांनी थेट राहुल गांधींना नागपूरमधील आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी पाचारण केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पुण्यातील स्वागताचे बॅनर व राजकीय पाठिंबा: पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमादरम्यान रोहित पवार यांनी शहरभर उभारलेले भव्य स्वागत बॅनर चर्चेत आले होते. या कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत देणारे विधान केले होते.
अजित पवारांचे विमान प्रकरण आणि पंढरपूरचे उपोषण: अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात त्यांनी दिल्लीत राहुल गांधींशी विशेष संवाद साधला होता. याशिवाय, पंढरपुरात रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली प्रत्यक्ष भेट ही या दोन्ही पक्षांतील वाढत्या जवळिकीचे प्रतीक मानली जात आहे.
‘विरोधी पक्षनेता नसल्याने राहुल गांधींकडे गेलो’: रोहित पवारांचे स्पष्टीकरण
पक्षांतराच्या चर्चेवर बोलताना रोहित पवार म्हणाले: “महाराष्ट्राच्या विधानसभा किंवा विधानपरिषदेत सध्या अधिकृत विरोधी पक्षनेता नाही. अशा वेळी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी देशाच्या विरोधी पक्षनेत्यांकडे जाणे हाच एकमेव पर्याय उरतो. आदिवासी बांधवांचे प्रश्न हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून मध्य प्रदेशसह संपूर्ण देशाशी संबंधित आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि हक्कांचा विषय असल्यानेच मी राहुल गांधींना यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.”








