Home सोलापूर वार्ता सकाळच्या प्रसन्न वातावरणात शिवचरित्राचा जागर; ‘हिंदवी परिवारा’चा आगळावेगळा उपक्रम

सकाळच्या प्रसन्न वातावरणात शिवचरित्राचा जागर; ‘हिंदवी परिवारा’चा आगळावेगळा उपक्रम

0

सोलापूर,दि.४: छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य आणि कर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हिंदवी परिवारा’च्या वतीने सोलापुरातील खंदक बगीचा येथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी विशेष शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे (Doctor Shivratna Shete) यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे हा उपक्रम तरुणांसह नागरिकांसाठी वैचारिक व प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे.

दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी ठीक ८ वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होते. सुरुवातीला पुस्तक वाचन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर डॉ. शिवरत्न शेटे यांचे प्रभावी व्याख्यान आणि शेवटी सकाळी साडेनऊ वाजता ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शिवचरित्र ऐकण्याचा अनुभव उपस्थितांसाठी अभूतपूर्व ठरत आहे.

या उपक्रमाच्या संयोजनात महेश धाराशिवकर, गुरुशांत धुत्तरगावकर, सिद्धेश्वर टेंगळे, श्रीकांत डांगे तसेच त्यांच्या ‘संभाजी आरमार परिवारा’चा मुख्य सहभाग आहे. या कार्यक्रमाला शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

आजच्या व्याख्यानात डॉ. शिवरत्न शेटे यांनी डीजेच्या वाढत्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम अधोरेखित करत, गणेश मंडळांनी गणेशोत्सव अधिकाधिक पारंपरिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भान जपत साजरा करण्याचे आवाहन केले. उत्सवातील ध्वनिप्रदूषणापेक्षा संस्कृती, परंपरा आणि समाजप्रबोधनाला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला. “शिवाजी महाराजांची आरती करून किंवा त्यांचे मंदिर उभारून त्यांना केवळ ‘देवत्व’ देण्यापेक्षा, त्यांनी हाडामासाचा माणूस म्हणून केलेले असामान्य कर्तृत्व समजून घेणे आणि ते पुढील पिढीसमोर आदर्श म्हणून मांडणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच, महाराजांच्या जीवनातील संघर्ष, दूरदृष्टी, शौर्य, संघटनकौशल्य आणि लोककल्याणाची भूमिका तरुणांनी आत्मसात करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

या कार्यक्रमास सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, पोलीस आयुक्त राजकुमार, महापालिका आयुक्त ओंबासे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिकेचे पक्षनेते नरेंद्र काळे, नगरसेवक विनोद भोसले, बिजू प्रधाने, सात्विक बडवे, शिवाजी गायकवाड, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत, अविनाश महागावकर, शहाजी पवार आणि प्रशांत बडवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सोलापुरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी या शिवव्याख्यानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य समजून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. “इतिहास हा केवळ ऐकण्याचा नव्हे, तर त्यातून प्रेरणा घेऊन वर्तमान घडवण्याचा विषय आहे,” हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.