मुंबई,दि.४: निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला. या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनीही पाठिंबा दिला. मोर्चानंतर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मतदारसंख्या वाढ, कथित मतचोरी आणि SIR प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवले. गेल्या काही वर्षांपासून आपण निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत असल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्येत मोठी वाढ झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरेंच्या नेमक्या दोन मागण्या काय?
या मोर्चातून राज ठाकरे यांनी आपल्या दोन प्रमुख मागण्या स्पष्ट केल्या. महाराष्ट्रात करण्यात आलेली SIR प्रक्रिया रद्द करण्यात यावी, ही त्यांची पहिली मागणी आहे. SIR म्हणजे मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनाची प्रक्रिया. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे यापुढील निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास निवडणूक प्रक्रियेबाबतचे अनेक प्रश्न स्पष्ट होतील आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला.
‘सत्ता कोणाचीही असो, ती योग्य मार्गाने यायला हवी’
राज ठाकरे यांनी यावेळी देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. दिल्लीमध्ये जाऊन या मुद्द्यावर भूमिका मांडण्याची विनंती त्यांनी विरोधी पक्षांना केली.
“उद्या कोणाचीही सत्ता आली तरी चालेल, मात्र ती सत्ता योग्य मार्गाने आली पाहिजे,” अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंनी काढलेल्या या मोर्चामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी आणि EVM विरुद्ध बॅलेट पेपर हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.








