ठाणे,दि.१५: ठाण्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. या वादात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेप्रकरणी रात्री उशीरा श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
किसन नगर येथे संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाने ठाकरे गटातील उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. ठाकरे गटाकडून याठिकाणी मेळावा घेण्यात येत होता. यावेळी एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप आहे. खासदार राजन विचारे हेही यावेळी उपस्थित होते.
या सर्व प्रकारानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा नव्हता, असा दावा म्हस्के यांनी केला आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, “मुळात त्याठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा नव्हता. तिथे शिंदे गटाकडून वाढदिवासाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे तिथे शिंदे गटाचे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्ते त्याठिकाणी आले. त्यांनी आमच्या नगरसेवकाला चुकीच्या पद्धतीने जाब विचारला. तसेच आमच्या नगरसेवकाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा प्रकार घडला आहे.”