सोलापूर,दि.14: जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जिल्हा परिषदेतर्फे राष्ट्रपती भवनात फ्लोरेंन्स नाइटींगेल पुरस्काराने सन्मानित मनीषा भाऊसाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी म्हणाले की आपण किती मोठ्या पदावर काम करतो हे महत्त्वाचे नसून आपल्या वाट्याला आलेले काम आपण किती प्रामाणिकपणे करतो त्यावर आपला सन्मान अवलंबून असतो. आरोग्य सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुण्य कमावण्यासाठी संधी आहे. आपली सेवा ही लोकांच्या जिवन मरणाशी निगडित आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली आरोग्य सेवा दिली आहे. जाधव यांचा देशपातळीवर झालेला सन्मान हा आपल्या जिल्ह्याचा गौरव आहे. आज बालदिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या मनातील बालक जिवंत ठेवावा. आपल्या वागण्या-बोलण्यात निरागसता जपावी जेणेकरून सुखी जीवन जगता येईल.
याप्रसंगी सहसंचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बगाडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव म्हणाले की मनीषा जाधव यांना मिळालेला पुरस्कार हा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा गौरव आहे. आमचे सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी चांगले काम करीत आहेत. परंतु जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणखी उत्तम कामगिरी आपण करावी व जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनिरुद्ध पिंपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी मानले.