मुंबई,दि.15: साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूवर (Mahesh Babu) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबूचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते कृष्णा घट्टमनेनी यांचं निधन झालं आहे. महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी हे सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. सुपरस्टार कृष्णा म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन महिन्यांपूर्वीच आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज वडिलांचं निधन झालं आहे.
महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांचं वयाच्या 80 वर्षी सोमवारी पहाटे निधन झालं. मध्यरात्री 1.15 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते.
कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला आहे. कृष्णा घट्टमनेंनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. महेश बाबूच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
2 महिन्यांपूर्वी आईचे निधन
दोन महिन्यांपूर्वीच महेश बाबूच्या आईचं निधन झालं होतं. त्या दु:खातून बाहेर येत नाही, तोवर महेश बाबू आणि कुटुंबीयांवर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला. महेश बाबू सातत्याने आपल्या कुटुंबीयांसोबत सोशल मीडियावर फोटोही शेअर करत होता.
कोण होते कृष्णा घट्टामनेनी?
महेश बाबूचे वडील तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. त्यांना कृष्णा या नावाने ओळखलं जायचं. ते अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि राजकारणीही होते. त्यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत तब्बल 350 चित्रपट केलेल होते. त्यांचा पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला होता. 1961 मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती.