मुंबई,दि.२३: भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशभरातील अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांनी या नेत्यांना पाटणा येथील बैठकीचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज (२३ जून) पाटण्यात विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. याला देशभरातील जवळपास २० पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या बैठकीला जाणार आहेत. या बैठकीला जाण्यापूर्वी शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली.
शरद पवार यांना यावेळी विचारण्यात आलं की, विरोधी पक्षांची पाटण्यात बैठक होतेय, या बैठकीत विरोधकांची काय रणनीति ठरवली जाणार आहे? यावर शरद पवार म्हणाले, ते आज सांगता येणार नाही. या बैठकीत देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. काही राज्यांमध्ये गंभीर प्रश्न आहेत, जसं की मणिपूरमधील अस्थिरता, यांसारख्या विषयांवर तिथे चर्चा होईल. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, या ना त्या निमित्ताने रस्त्यावर उतरणं, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणं अशी कृत्ये देशात वाढली आहेत. विशेषतः ज्या राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही तिथे हे सगळं घडत आहे. त्यामुळे यामागे कोण आहे हे स्पषट होतंय. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यांसारख्या प्रश्नांवर एकत्रितपणे विचार करून एक भूमिका ठरवावी एवढाच आजच्या बैठकीचा विषय आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, या बैठकीत अन्य राज्यांमधील महत्त्वाचे मुद्दे तिथले नेते उपस्थित करतील. परंतु ते मुद्दे काय असतील ते मी आत्ता सांगू शकणार नाही. तसेच यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आलं की, या बैठकीला काँग्रेस उपस्थित असेल का? त्यावर शरद पवार म्हणाले, हो, या बैठकीला काँग्रेसचीही उपस्थिती असेल.