मुंबई,दि.२६: Sharad Pawar Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्याला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करून पक्ष संघटनेत काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी अजित पवारांनी केली होती. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनधरणी केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी निर्णय मागे घेतला. मग वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? अशी जोरदार चर्चा रंगली. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पुन्हा या चर्चेला बळ मिळालं. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार काय म्हणाले होते? | Sharad Pawar Ajit Pawar
एकीकडे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नसल्याची चर्चा सुरू झाली. अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं. अखेर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली.
“विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती. पण, आमदारांचा आग्रह आणि त्यांनी स्वाक्षऱ्या गोळा केल्याने ते पद स्वीकारले आणि गेले वर्षभर काम केले. मात्र, आता हे पुरे झाले. पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या”, असं अजित पवारांनी बुधवारी आयोजित कार्यक्रमात म्हटलं. त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे तर्क-वितर्कांना उधाण आलं.
शरद पवार काय म्हणाले?
एकीकडे सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे अजित पवार पक्षसंघटनेतून बाजूला सारले गेल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या इच्छेबाबत खुद्द शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात स्वत: अजित पवारांसह प्रमुख लोक बसून निर्णय घेतील, असं शरद पवार म्हणाले आहेत.
“हा निर्णय कुणी एकटा घेत नसतो. अजित पवारांसह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंदर्भातला निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनीच लक्ष द्यावं अशी भावना आहे. तेच मत त्यांनी व्यक्त केलं. त्यापेक्षा वेगळं काही नाही”, असं शरद पवारांनी नमूद केलं.