मुंबई,दि.19: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत पुस्तकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यावरील एक पुस्तक बाजारात आले असून, त्याची बरीच चर्चा सुरू झाली आहे. या पुस्तकात उत्तर प्रदेशच्या आतापर्यंतच्या 21 मुख्यमंत्र्यांच्या कार्याबद्दल आणि जीवनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसशी संबंधित ज्येष्ठ पत्रकार श्यामलाल यादव यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ज्येष्ठ पत्रकार श्यामलाल यादव यांनी At The Heart Of Power: The Chief Ministers of Uttar Pradesh या पुस्तकात अनेक दावे केले आहेत.
पुस्तकातून खळबळजनक दावा
2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना हटवण्याची पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा त्यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. श्यामलाल यादव यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, उत्तर प्रदेशातील 2022 च्या निवडणुकीसाठी एकूण नऊ महिने शिल्लक होते. अशा स्थितीत लखनऊ ते दिल्लीपर्यंत भाजपा आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या.
एका क्षणी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय झाला होता. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात कोणताही बदल होण्याआधीच भाजप हायकमांडच्या लक्षात आले की, योगींना जर कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच हटवल्यास पक्षाला नुकसान सहन करावे लागेल.
श्याम लाल यादव यांनी आपल्या पुस्तकात योगींना हटवण्याच्या प्रयत्नामागचे कारण दिलेले नाही, मात्र योगींवर लिहिलेल्या 16 पानांमध्ये योगी सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपशील दिला आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याशी त्यांचे मतभेद वाढत होते. श्यामलाल यादव पुढे लिहितात की, तथापि, आरएसएस नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर 22 जून 2021 रोजी योगी आदित्यनाथ अचानक केशव प्रसाद मौर्य यांना भेटायला आले.
दोन्ही नेत्यांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात होते. एप्रिल 2016 मध्ये केशव प्रसाद मौर्य यांना भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले आणि मार्च 2017 मध्ये भाजपच्या विजयानंतर त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, मात्र योगी यांना मुख्यमंत्री करण्यात आले, तेव्हापासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.