मुंबई,दि.२०: Rohit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात रोहित पवार यांनी मोठं विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. पक्षनाव आणि चिन्हावर अजित पवार गटाकडून दावा सांगितला आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. याबाबत आयोगानेही दोन्ही गटाला नोटीस पाठवून तीन आठवड्यांच्या आत आपलं स्पष्टीकरण द्या, असं सांगितलं आहे. ही कायदेशीर लढाई सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
Rohit Pawar NCP | पक्षात कुठेही फूट पडली नाही
आख्खा पक्ष आमच्याकडे आहे. पक्षात कुठेही फूट पडली नाही. पक्षात फूट पडली आहे, हे अजित पवार गटाने सांगावं, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पक्षफुटीवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “आख्खा पक्ष आमच्याकडे आहे,असं सांगावं लागतं. त्यामुळे शरद पवारांच्या विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं आहे, की आख्खा पक्ष आमच्याकडे आहे. फूट कुठेही पडली नाही. त्यामुळे दुसऱ्या गटाने (अजित पवार गट) सांगावं की, फूट कशी पडली? यासाठी दोन्ही गट कायदेशीर चौकटीत आपापली मतं व्यक्त करत आहेत.”
“तसं पाहिलं तर लोकांची भावना त्या गटाच्या (अजित पवार गट) विरोधात आहे, पण भाजपाची खूप मोठी ताकद त्यांच्या बाजुला आहे. इतरही काही संस्था असतात, त्याही त्यांच्याच बाजुने आहेत. शरद पवारांकडे सामान्य नागरिक आहे. लोकांची ताकद आहे. लोकशाही आहे. त्यामुळे आम्ही लोकशाहीत लोकांना विश्वासात घेऊन लढत आहोत. त्या बाजुला सत्तेची ताकद आहे. बलाढ्य पदाधिकाऱ्यांना घेऊन ते तिथे लढत आहेत. येत्या काळात लोकशाही जिंकते की बलाढ्य शक्ती जिंकते? ते आपण पाहू…”, असंही रोहित पवार म्हणाले.