मुंबई,दि.१९: Anand Dave On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्या घरात किती शिवाजी आणि संभाजी नावाचे लोक आहेत ते सांगावं, असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी म्हटले आहे. ब्राम्हण समाजासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वक्तव्य केले आहे. ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “काही लोकांना सरस्वती तर काही लोकांना शारदा आवडते. परंतु, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली. आम्ही कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही.”
आनंद दवे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला | Anand Dave On Chhagan Bhujbal
दरम्यान, हिंदू महासंघाने छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. दवे म्हणाले, छगन भुजबळांनी आज पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. मुळात भुजबळ यांचं हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीला बदनाम करण्याचं धोरण का असतं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. तसेच भुजबळ यांनी त्यांच्या घरात किती शिवाजी आणि संभाजी नावाचे लोक आहेत ते सांगावं. (Anand Dave On Chhagan Bhujbal)
आनंद दवे छगन भुजबळ यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलांची नावं शिवाजी किंवा संभाजी अशी का ठेवली नाही? तुम्ही ओबीसी समाजाचं राजकारण करताना मराठा समाजाला नावं का ठेवता? भुजबळ यांचं हे वक्तव्य मुर्खपणाचं आहे असं आम्ही (हिंदू महासंघ) मानतो. अनेक जातींमध्ये शिवाजी आणि संभाजी अशी नावं असलेली वेगवेगळी माणसं आम्ही दाखवू शकतो. परंतु, येथे व्यक्तीशः उल्लेख करणं योग्य नाही. छगन भुजबळ तुम्हाला अशी नावं सापडली नाहीत तर आम्ही का देऊ.
आनंद दवे अधिक आक्रमक होत म्हणाले, इतरांवर बोलण्याआधी छगन भुजबळ यांनी आधी स्वतःच्या घरातली नावं बदलावी. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचं नाव बदला आणि शिवाजी भुजबळ करून दाखवा, त्यानंतर आमच्याशी बोला.