मुंबई,दि.२०: Vijay Wadettiwar On Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राम्हण समाजासंदर्भात वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाविषयी एक विधान केलं. यात त्यांनी ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं म्हटलं. यानंतर आता यावर काँग्रेस नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवारांनी भुजबळांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला. तसेच शब्द फिरवला नाही, तर ते खरे भुजबळ असं म्हणत टोलाही लगावला. ते रविवारी (२० ऑगस्ट) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
छगन भुजबळांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार… | Vijay Wadettiwar On Chhagan Bhujbal
विजय वडेट्टीवार म्हणाले, “छगन भुजबळ म्हणाले ते खरं आहे, ती वस्तूस्थिती आहे. भुजबळ तिथे राहून वस्तूस्थिती बोलत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही छगन भुजबळांकडे बहुजनांचे नेते म्हणून बघत होतो. ते या वाक्यावर ठाम राहिले, डगमगले नाही, वक्तव्य मागे घेतलं नाही, शब्द फिरवला नाही तर ते खरे भुजबळ.”
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले होते, “काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे-तिकडे गेलात. पण, कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही.”
“संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दामन संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं,” अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.
“इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल. कारण, जोपर्यंत आपला इतिहास माहिती होणार नाही, तोपर्यंत आपण भविष्याकडे बघू शकत नाही. राज्यक्रांतीकारकापासून समाजक्रांतीकारपर्यंत हा आपला वारसा आहे. महात्मा फुलेंनी सांगितलंय, ‘सत्तेविना सर्व कळा झाल्या अवकळा.’ सत्ता असेल, तर तुम्ही समाजासाठी पाहिजे ते करू शकता,” असेही छगन भुजबळ यांनी सांगितलं.